मुंबई: गुढीपाडव्याचा मुहुर्त साधत प्रमुख राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज काँग्रेसचा बालेकिल्ला असणार्या नांदेडमध्ये तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवाजी पार्क येथे प्रचारसभा होणार आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला नांदेड व हिंगोली या दोनच जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे पुन्हा नांदेडमधून लोकसभा निवडणूक लढवत असून, त्यांच्या विरोधात भाजपने प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली आहे. चिखलीकर यांच्या प्रचारार्थ खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नांदेडमध्ये कौठा भागात सभा होणार आहे. मोदींच्या सभेमुळे नांदेडमधील लढत आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे. या सभेत मोदी नांदेडमध्ये विकासावर बोलणार की, विरोधकांच्या घराणेशाहीवर याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मनसे लोकसभा निवडणूक लढणार नसली तरी भाजप व मोदीविरोधात प्रचार करण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी व भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरुद्ध दंड थोपटले असून, आजच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.